नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर आधारित महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असून, महाराष्ट्रातील लघु व मध्यम क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक बळकटीकरण तसेच शेतीसाठी आवश्यक अवजारे, बियाणे, खते, कीटकनाशके, व तणनाशके इत्यादी खरेदी करण्यास शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागणार आहेत.
शासन निर्णय :- महाराष्ट्र विधानसभेत योजनेची घोषणा त्यावेळीचे मा. अर्थमंत्र्यांनी केली होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी १००% अर्थसहाय्य महाराष्ट्र शासनाचे असून, शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अधिकृत जीआर शासन निर्णय क्रमांक : किसनि-२०२३/प्र.क्र.४२/११-अ दिनांक १५ जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला. त्यांचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२३०६१५१७४५५१३१०१ असा आहे.
महाडीबीटी :- प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासन शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधरावी यासाठी प्रति वर्ष ६०००/- रुपये तीन हप्त्यात २०००/- रुपये प्रमाणे लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (महा-डीबीटी) अंतर्गत वर्ग केले जातात. पीएम-किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी योजनेचा पहिला हप्ता मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते शिर्डी येथील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला.
अर्थसहाय्य :- "नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' महाराष्ट्र शासनाची असून राज्य शासनाचे १००% अर्थसहाय्य आहे. तसेच पीएम-किसान ही केंद्र शासनाची योजना असून, त्यास केंद्र शासनाचे १००% अर्थसहाय्य देण्यात येते. या दोन्ही योजनांचे अनुदान वर्ग करण्याची पद्धती सारखी आहे.
सनियंत्रण :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अनुदान वितरण करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
कार्यपद्धती :- हप्ते वितरीत करण्याचा कालावधी पहिला हप्ता : एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता : ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च असे दर चार महिन्यांनी २०००/- रुपये प्रमाणे एकूण ६०००/- रुपये एका वर्षाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (महा-डीबीटी) अंतर्गत वर्ग करण्यात येतात.
पात्रता :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र व अपात्र मापदंड ठरलेले असून प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र असणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासन (कृषी मंत्रालय) यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणे बंधनकारक राहील.
अपात्रता :- प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र असलेले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस अपात्र असणार आहे. महाराष्ट्र शासन (कृषी मंत्रालय) यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणे बंधनकारक राहील.
